ई-पेपरक्रिडा व मनोरंजन

बासरीतून उमटणारे जादूई सूर आणि वादनाला लाभलेली लयबद्ध सुरेल साथ,ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌तर्फे स्वरानुभूती मैफलीचे आयोजन

बासरीतून साकारणाऱ्या जादूई सुर मैफल

0 0 6 3 2 6

ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌तर्फे स्वरानुभूती मैफलीचे आयोजन

पुणे : बासरीतून उमटणारे जादूई सूर आणि वादनाला लाभलेली लयबद्ध सुरेल साथ यातून स्वरानुभूती मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. निमित्त होते ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌ आयोजित प्रसिद्ध बासरी वादक अमर ओक यांच्या बासरीवादन मैफलीचे!

कोथरूड येथील ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌च्या सांगीतिक दालनात मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या मैहर घराण्याची परंपरा आणि कै. पं. केदार बोडस यांच्या ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा ठसा त्यांच्या वादनात प्रभावीपणे उमटतो. अमर ओक यांनी आपल्या मैफलीची सुरुवात गायकी अंगाने राग यमन ऐकवून केली. विलंबित एकताल, मध्यलय तीनताल आणि द्रुतलय एकतालातील सादरीकरणाने रसिकांना सुरांची मेजवानी लाभली.

राग गोरख कल्याण सादर करताना ओक यांनी मध्यलय झपताल आणि मध्यलय तीनतालात दोन रचना सादर केल्या. सुरांची नजाकत आणि सुमधूर वादनाने रसिक मोहित झाले. तंतकारी अंगाने वादन सादर करताना अमर ओक यांनी राग जोग ऐकवून त्यात आलाप, जोड, झाला सादर करताना मध्यलय रूपक आणि द्रुत तीनतालात प्रभावी वादन केले.

रसिकांच्या खास आग्रहास्तव अमर ओक यांनी कार्यक्रमाची सांगता बासरीवर विविध अभंगांच्या सादरीकरणाने केली. यात ‘राजस सुकुमार’, ‘काया ही पंढरी’, ‘अबीर गुलाल’, ‘माझे माहेर पंढरी’ हे सुप्रसिद्ध अभंग ऐकविले. या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात साथ केली.

बासरीतून साकारणाऱ्या जादूई सुरांशी रसिकांनी जणू अद्वैत साधत अध्यात्माची अनुभूती घेतली. अमर ओक यांना तबल्यावर अजिंक्य जोशी यांनी समर्पक साथ केली. अभय ओक व प्रसाद मेहेंदळे यांनी तानपुरा साथ केली.

स्वरानुभूती मैफलीच्या माध्यमातून पूर्णवेळ एका कलाकाराचे सादरीकरण रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविता येते याविषयी अमर ओक यांनी समाधान व्यक्त केले. कलाकारांचा सत्कार ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌चे संचालक प्रवीण कडले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती पोरवाल यांनी केले. फोटो : अमर ओक आणि अजिंक्य जोशी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 3 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे