ई-पेपरक्रिडा व मनोरंजन
काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे १५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा काणेबुवा प्रतिष्ठानचा उपक्रम स्तुत्य : पंडित विजय घाटे
शास्त्रीय संगीताची परंपरा जोपासण्याचा प्रयत्न : इंद्रनील चितळे
0
0
6
3
2
6
काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे १५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान
विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा काणेबुवा प्रतिष्ठानचा उपक्रम स्तुत्य : पंडित विजय घाटे
शास्त्रीय संगीताची परंपरा जोपासण्याचा प्रयत्न : इंद्रनील चितळे
पुणे : पुण्या-मुंबईप्रमाणेच लहान-लहान शहरांमध्येही सांगीतिक क्षेत्रात अनेक गुणवंत विद्यार्थी आहेत. त्यांना योग्य ज्ञानाबरोबर शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देण्याचा काणेबुवा प्रतिष्ठानचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांनी केले.
अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतात कायम कार्यरत राहू इच्छिणाऱ्या १२ ते २५ वयोगटातील १५ विद्यार्थ्यांना संगीताचार्य काणेबुवा फाऊंडेशनतर्फे संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. उद्योजक इंद्रनील चितळे, पंडित विजय घाटे यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. त्या वेळी पंडित विजय घाटे बोलत होते. सांगली आणि भिलवडी येथील प्रतिष्ठानच्या गुरुकुलातील विद्यार्थ्यांसह वेगवेगळ्या गुरूंकडे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठाचे अध्यक्ष गोविंदराव बेडेकर, सचिव प्रसिद्ध गायिका मंजुषा पाटील, विश्वस्त शेखर गायकवाड, डॉ. हेमंत अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. कोथरूड येथील पुण्याई सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रास्ताविकात उपक्रमाविषयी माहिती देताना मंजुषा पाटील म्हणाल्या, शास्त्रीय संगीत शिक्षणातील उज्ज्वल वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून १५ गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. शिष्यवृत्ती देण्यासाठी गायन तसेच संवादिनी आणि तबला वादनाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे.
इंद्रनील चितळे म्हणाले, अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा खूप मोठी आहे. ही परंपरा युवा वर्ग पुढे नेत आहे शास्त्रीय संगीताची परंपरा-संस्कृती जोपसण्याचा आणि युवा वर्गाला स्वरमंच मिळवून देण्यासाठी चितळे उद्योग समूहाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. शेखर गायकवाड, डॉ. हेमंत अभ्यंकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
\या निमित्ताने ‘अभंगरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात विदुषी मंजुषा पाटील यांचे शिष्य अनुष्का साने, तनिष्क अरोरा तसेच विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या शिष्या श्रद्धा गद्रे, जान्हवी गद्रे यांचा सहभाग होता. कलाकरांना कार्तिकस्वामी दहिफळे (तबला), स्वरूप दिवाण (संवादिनी), विनीत तिकोणकर (पखवाज), आनंद टाकळकर (टाळ) यांनी साथसंगत केली तर ह. भ. प. मानसी बडवे यांनी निरूपण केले. फोटो ओळ : संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान आयोजित शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यात उपस्थित मान्यवर आणि शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थी.
0
0
6
3
2
6


