ई-पेपरसंपादकीय

अनुभवांची समृद्धी, निरीक्षण आणि संयमातून सकस कवितेची निर्मिती शक्य : जयंत भिडे मसापतर्फे कवी यशवंत आणि इर्लेकर पुरस्कारांचे वितरण

सकस कवितेच्या निर्मितीसाठी आवश्यक ती गुणसंपदा

0 0 6 3 2 6

अनुभवांची समृद्धी, निरीक्षण आणि संयमातून सकस कवितेची निर्मिती शक्य : जयंत भिडे

मसापतर्फे कवी यशवंत आणि इर्लेकर पुरस्कारांचे वितरण

पुणे : सकस कवितेच्या निर्मितीसाठी कवीपाशी अनुभवांची समृद्धी, सूक्ष्म निरीक्षण आणि संयम हवा. त्यातूनच अत्तराच्या थेंबासारखा कवितेचा जन्म होतो आणि रसिकांच्या मनाचे गाभारे गंधित होतात,  असे उद्गार ज्येष्ठ कवी जयंत भिडे यांनी येथे काढले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कवयित्री शिवप्रिया सुर्वे यांना ‘उधळ माधळ वारा’ या कवितासंग्रहासाठी कवी यशवंत पुरस्कार तर सोनाली लोहार यांना ‘बाकी काही नाही’ या कवितासंग्रहासाठी सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कार शनिवारी (दि. १८) प्रदान करण्यात आला. पुरस्कारांचे वितरण भिडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सन्मानपत्र व रोख रक्कम असे या पुरस्कारांचे स्वरूप होते. प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कार्यवाह सुनेत्रा मंकणी व्यासपीठावर होते.

या पुरस्कारांसाठी कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे,  डॉ. वैशाली मोहिते, मिलिंद सुधाकर जोशी आणि प्रभा सोनवणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले भिडे यांनी मनोगतात स्वतःची कविता, गीतलेखनाची कारकीर्द उलगडली. शिवप्रिया सुर्वे आणि सोनाली लोहार यांच्या कविता गुणवत्तेच्या आहेत, असे ते म्हणाले. कवितेचे येणे अनिश्चित असते कारण कविता प्रतिभेतून जन्म घेते. सकस कवितेच्या निर्मितीसाठी आवश्यक ती गुणसंपदा या कवयित्रींपाशी आहे आणि मी त्यांच्या कवितेचा चाहता आहे, असेही ते म्हणाले.

शिवप्रिया सुर्वे यांनी माणुसकीचा धर्म, कवितेचे स्वत्त्व आणि सत्त्व जपण्याचे अभिवचन कवितेच्या माध्यमातून दिल्याची भावना व्यक्त केली. सोनाली लोहार म्हणाल्या, आनंदाची आणि जबाबदारीची भावना जागवणारा हा पुरस्कार आहे. मौन हा माझ्या कवितांचा गाभा आहे. मी मोजके कवितालेखन केले आहे आणि भाषाही सोपी, सहज आहे. अनलंकृत आहे. वैयक्तिक विश्व आणि भोवताल, दोन्ही ठिकाणी सतत खूप काही घडत आहे. अशा वातावरणात कवितेने मला मोकळा श्वास घ्यायला शिकविले. कविताच प्रसंगानुसार माझी ढाल – तलवार झाली. एकाचवेळी कविता एकटेपण देते आणि रसिकांशी जोडतही राहते, हे मला महत्त्वाचे वाटते.

परीक्षकांच्या वतीने मिलिंद सुधाकर जोशी आणि डॉ. वैशाली मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. कवितासंग्रह जाणिवा समृद्ध करणारे होतेच, पण वाचकाला विचारप्रवृत्त करणारे, संवेदना जागवणारेही होते. परिचित विषयांची वेगळी आणि नवी मांडणी या कवितांमधून आढळते, असे निरीक्षण परीक्षकांनी नोंदवले. प्रकाशक गीतेश शिंदे, शिरीष शिरसाट आदी उपस्थित होते.

प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक यांनी स्वागतपर प्रास्ताविकात कवी यशवंत आणि सुहासिनी इर्लेकर यांच्या साहित्यिक कारकिर्दीवर भाष्य केले. मसापच्या स्थानिक कार्यवाह सुनेत्रा मंकणी यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन केले व आभार मानले.फोटो ओळ : महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) शिरीष शिरसाट, गीतेश शिंदे, सोनाली लोहार, जयंत भिडे, डॉ. स्वाती महाळंक, शिवप्रिया सुर्वे आणि सुनेत्रा मंकणी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 3 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे