क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

संशोधन, व्यासंग आणि समीक्षकीय दृष्टी यांचा कॅलिडोस्कोप म्हणजे प्रसाद फाटक आणि राजीव श्रीखंडे यांचे ग्रंथ – इंग्रजीच्या व्यासंगी अभ्यासक आणि एसएनडीटीच्या माजी प्राचार्या डॉ. मुक्तजा मठकरी

मसापचे अध्यक्ष योगेश सोमण अध्यक्षस्थानी

0 0 6 3 2 6

फाटक, श्रीखंडे यांचे ग्रंथ म्हणजे संशोधन, व्यासंग आणि समीक्षकीय दृष्टीचा कॅलिडोस्कोप : डॉ. मुक्तजा मठकरी

मसापतर्फे द. वा. पोतदार व रा. श्री. जोग स्मृती पुरस्कार प्रदान समारंभ साजरा

पुणे : संशोधन, व्यासंग आणि समीक्षकीय दृष्टी यांचा कॅलिडोस्कोप म्हणजे प्रसाद फाटक आणि राजीव श्रीखंडे यांचे ग्रंथ आहेत, असे उद्गार इंग्रजीच्या व्यासंगी अभ्यासक आणि एसएनडीटीच्या माजी प्राचार्या डॉ. मुक्तजा मठकरी यांनी गुरुवारी येथे काढले. वस्तुनिष्ठता आणि अधिकृतता यातून चरित्रनायकाच्या अस्सल स्वरूपावर प्रकाश टाकणारे हे जणु रेखीव आकृतीबंधच आहेत, असेही त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या द. वा. पोतदार आणि रा. श्री. जोग स्मृती पुरस्कार प्रदान कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. इतिहासविषय़क ग्रंथासाठीचा द. वा. पोतदार स्मृती पुरस्कार प्रसाद फाटक लिखित ‘सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यू कन्हैयालाल मुन्शी’ या ग्रंथाला तर समीक्षात्मक ग्रंथासाठीचा रा. श्री. जोग स्मृती पुरस्कार राजीव श्रीखंडे यांच्या ‘ग्लोबल साहित्य सफर’ या ग्रंथाला तसेच प्रकाशकासाठीचा पुरस्कार ग्रंथाली प्रकाशन संस्थेला डॉ. मठकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ग्रंथालीचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी प्रकाशकांसाठीचा पुरस्कार स्वीकारला. मसापचे अध्यक्ष योगेश सोमण अध्यक्षस्थानी होते. मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम झाला. सन्मानपत्र आणि धनादेश, असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

डॉ. मुक्तजा मठकरी यांनी मसाप वास्तूशी असलेल्या जिव्हाळ्याचे बंध उलगडले. माझ्यासाठी मसाप हे कृतज्ञतेचे देऊळ आहे, असे त्या म्हणाल्या. माझ्या बाबांनी (लेखक संपादक राम कोलारकरांनी) मराठीसह जागतिक साहित्यातील सर्वोत्कृष्ट कथाही मराठीमध्ये संपादित केल्या. मुळापर्यंत जाणारे अभ्यासकच उत्तम संशोधक होतात, हे सिद्ध करणारे हे ग्रंथ आहेत. साहित्यनिर्मितीचे प्रयोजन आणि प्रकृती, या दोन्ही घटकांना सामावणारे हे ग्रंथ आहेत. इतिहास आणि वास्तवाशी प्रामाणिक राहून दोन्ही ग्रंथ संशोधनाच्या भक्कम पायावर उभे आहेत. त्यांचे संदर्भमूल्य फार मोठे आहे. इतिहासाशी ईमान राखून समकालीन निकटत्वाचाही शोध लेखकांनी ग्रंथांतून घेतल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. ग्लोबल साहित्य सफरमध्येही साहित्याच्या जागतिक वारशाचे प्रतिनिधी असणारे लेखक भेटतात, असेही त्या म्हणाल्या.

मनोगतात राजीव श्रीखंडे यांनी हा पुरस्कार वैयक्तिक नसून, जागतिक स्तरावरील कालजयी लेखक आणि त्यांच्या साहित्यकृतींचा गौरव आहे, अशी भावना व्यक्त केली. मी लेखक नंतर पण आधी वाचक आहे, असे सांगून ते म्हणाले, जगभरातील या उत्तम लेखकांनी मला उत्तरांपेक्षा प्रश्न अधिक विचारले. मानवी जीवन, सुखदुःखे, आशा, आकांक्षा, समस्या, नैतिकता, मूल्यविचार अशा घटकांवर विचारप्रवृत्त केले. थोडे थांबायला, ऐकायला, स्वतःच्या मर्यादा ओळखायला शिकवले आणि माणूस म्हणून स्वतःकडे सजगतेने पहायलाही शिकवले. त्यांच्या लेखनातून दिसलेले मानवी जीवनाचे विभ्रम मला समृद्ध करणारे ठरले.

प्रसाद फाटक यांनी कन्हैयालाल मुन्शी या चरित्रनायकाविषयी विस्तृत माहिती दिली. महामहोपाध्याय पोतदार आणि मुन्शीजी, यांच्यातील साम्यस्थळांचाही मागोवा त्यांनी घेतला. इतिहासलेखन, संशोधन, संस्कृतीचे अभ्यासक त्यांच्या कार्याचा परिघ प्रचंड होता. दोघांनीही वैयक्तिक आणि संस्थात्मक कार्याचे आदर्श निर्माण केले. या पुरस्काराच्या निमित्ताने ही दोन्ही नावे जोडली गेल्याचा योग विलक्षण आहे, असे ते म्हणाले.

अध्यक्षीय समारोप करताना सोमण म्हणाले, मुन्शी यांच्या व्यक्तिमत्त्वातील उत्तुंगपणा या ग्रंथामुळे लक्षात आला. ओघवती शैली, सहज आणि सोपेपणा यामुळे चरित्रनायकाचे अवघे जीवन वाचकासमोर उलगडत नेणारे हे लेखन आहे. 

मसापचे स्थानिक कार्यवाह डॉ. आशुतोष जावडेकर यांनी ग्लोबल साहित्य सफर या ग्रंथाचा परिचय करून दिला.

हिंगलासपूर यांनी ग्रंथालीच्या उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. स्थानिक कार्यवाह सुनेत्रा मंकणी यांनी परिचय करून दिला आणि सूत्रसंचालन केले.

फोटो ओळ : महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यात (डावीकडून) सुदेश हिंगलासपूर, राजीव श्रीखंडे, प्रसाद फाटक, योगेश सोमण, डॉ. मुक्तजा मठकरी, डॉ. स्वाती महाळंक, सुनेत्रा मंकणी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 3 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे