0
0
6
3
2
6
शंभराव्या साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागाकडून पाच कोटी : उदय सामंत
मसापच्या वास्तूसाठी एक कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द
देश-परदेशातील नांदी संमेलने, विद्यार्थी संमेलनांसाठीही आर्थिक तरतूद
पुणे : पुण्यामध्ये आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पाच कोटी रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतलेला असून या निमित्त होणाऱ्या ९९ नांदी साहित्य संमेलनांसाठी देखील पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच परदेशात होणाऱ्या १२ संमेलनांसाठी सीएसआरच्या माध्यमातून दोन कोटी तसेच विद्यापीठांमध्ये होणाऱ्या १३ विद्यार्थी साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे राज्यातील तेरा विद्यापीठांना मिळून चार कोटी रुपये देणार, असा एकंदरीत १८ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज (दि. ३०) पत्रकार परिषदेत दिली. परिषदेची वास्तू अद्ययावत करण्यासाठी एक कोटी रुपयांचा धनादेशही त्यांनी या प्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सोपविला.
पुण्यात होत असलेल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासंदर्भात उदय सामंत यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी आज (दि. ३०) संवाद साधला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उदय सामंत बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, संमेलनाचे संयोजक, समर्थ युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, राज्याच्या भाषा विभागाचे सचिव शांमकांत देवरे, परिषदेचे स्थानिक कार्यवाह सुनील महाजन, सुनेत्रा मंकणी, डॉ. अशुतोष जावडेकर, प्रसाद मिरासदार, राजन लाखे उपस्थित होते.
शंभर वर्षे मराठी साहित्यिक व साहित्य रसिकांनी साहित्य संमेलनांचे आयोजन केले हे एक अद्भुत धाडसच आहे, असे सांगून उदय सामंत पुढे म्हणाले, मराठी भाषेची परंपरा आणि संस्कृती पुढच्या पिढीने जतन केली पाहिजे या इच्छेने मराठी भाषा विभाग साहित्य परिषदेच्या मागे ठामपणे उभा आहे. शंभराव्या साहित्य संमेलनाचा केवळ गाजावाजा किंवा इव्हेंट न करता मराठी भाषा सर्वत्र रुजणे या उद्देशाने आम्ही कार्यरत आहोत.
साहित्य संमेलनांच्या माध्यमातून फक्त शहरी साहित्यिकांनाच प्राधान्यक्रम देणे योग्य नसून मराठी ग्रामीण साहित्याचे तसेच बोलीभाषेचे जतन व संवर्धन होणे अत्यंत आवश्यक आहे. मराठी भाषेवर जेव्हा बोलले जाते, चर्चा केली जाते त्या वेळी मराठी भाषेबद्दल काही राजकीय वादही झालेले असतात. हे वाद देखील संमेलनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाणे आवश्यक आहेत. सरकार म्हणून काम करत असताना मराठी भाषेचा अपमान होईल किंवा तिला डावलले जाईल अशा पद्धतीचे निर्णय कधीच घेतले नाहीत आणि भविष्यातही घेतले जाणार नाहीत. म्हणून अशा संमेलनांच्या माध्यमातून मराठी भाषा बालकांपासून वृद्धांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मराठी भाषेच्या निमित्ताने ज्या ज्या घोषणा केल्या, वचने दिलेली आहेत त्याविषयी निर्णय घेण्यासाठी पुढील १५ दिवसात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली जाईल अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली.
शंभरावे साहित्य संमेलन सगळे जग पाहिल अशा दर्जेदार पद्धतीचे असेल आणि ही शंभराव्या साहित्य संमेलनाची प्रथा पुढील साहित्य संमेलनांनी जोपासावी अशा पद्धतीचे वातावरण महाराष्ट्रात, देशातच नव्हे तर परदेशातही निर्माण करू असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
राज्य भाषा सल्लागार समितीची २०१९ साली खंडित झालेली बैठक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या कालावधीत पुन्हा सुरू झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बैठक घेतली. या समितीचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी भाषा सल्लागार समितीची बैठक दर तीन किंवा सहा महिन्यांनी घेतली गेली पाहिजे, असा निर्णय मराठीवर प्रेम करणाऱ्या आणि मराठी भाषेला दिशा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी घेतला असल्याचे सावंत यांनी सांगितले.
इतर भाषांमधील साहित्य मराठी भाषेत अनुवादित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याकरीता १९६० सालात तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अनुवाद समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. परंतु काही कारणास्तव हे कार्य खंडित झाले होते. पण या वर्षीपासून स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने पुन्हा एकदा ही अनुवाद समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या साहित्यिकांना इतर भाषांमधील साहित्य मराठी भाषेत अनुवादित करायचे आहे तसेच मराठी भाषेतील साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित करणाऱ्यांसाठी काही अटींवर निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मराठी विभागाने घेतलेला आहे, असे सावंत म्हणाले.
बोली भाषा हा सर्व भाषांचा गाभा असल्यामुळे बोली भाषेचा शब्दकोश देखील असला पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले. बोली भाषा केवळ जगल्याच पाहिजेत असे नाही तर या भाषा भावी पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या गोष्टींचा विचार देखील साहित्य संमेलनांमध्ये झाला पाहिजे.
राजेश पांडे म्हणाले, पुण्यात होणारे शंभरावे साहित्य संमेलन जगाभरातील मराठी भाषिकांपर्यंत पोहोचावे, संमेलनाच्या पार्श्वभूमीवर देशातील बृहन महाराष्ट्र मंडळाची संयुक्त बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हावी, तसेच शंभराव्या संमेलनापूर्वी देश-विदेशात ९९ नांदी संमेलने घेण्यात येणार असून यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यांनी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. शंभराव्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेची चळवळ उभी करायची असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविकात योगेश सोमण म्हणाले, उदय सामंत यांच्या समवेत झालेल्या बैठकीत अनेक आश्वासक गोष्टी घडल्या आहेत. संमेलनाच्या निमित्ताने होणारे उपक्रम मराठी भाषा विभाग आणि साहित्य संस्कृती महामंडळाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार आहेत. अभिजात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अपेक्षित ध्येयधोरणांना अनुसरून मसापचे सहकार्य असेल.सुनील महाजन यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. स्वाती महाळंक यांनी आभार मानले. फोटो ओळ : महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे एक कोटीचा धनादेश योगेश सोमण यांच्याकडे सोपविता उदय सामंत. समवेत शांमकांत देवरे, प्रदीप निफाडकर, राजेश पांडे, डॉ. स्वाती महाळंक, सुनील महाज
0
0
6
3
2
6


