
0
0
6
3
2
6
तुळजापूर-शेळगाव (आर) बस फेरीच्या पाहणीत ओढ्यावरील पुलाची अडचण उघड; प्रशासकीय उदासीनतेमुळे दयानंद बादगुडे यांचा १५ ऑगस्टला उपोषणाचा एल्गार
तुळजापूर दिनांक 13 डॉ. सतीश महामुनी
स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर देखील मूलभूत सुविधा रस्ता आणि आपल्या गावाला एसटी बस मिळावी म्हणून अनेक वर्ष संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते दयानंद बादगुडे यांना देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी याच समस्येसाठी उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्राच्या प्रशासकीय पातळीची शोकांतिका म्हणावी लागेल.
तुळजापूर ते शेळगाव (आर) या एसटी बस फेरीला सावंतवाडी क्र. २ ते वाणेवाडी (ग्रुप ग्रामपंचायत) मार्गे वळसा देऊन पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दयानंद भगवान बादगुडे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत १३ ऑगस्ट २०२६ रोजी धाराशिव आगाराची प्रत्यक्ष एसटी बस आणून वाणेवाडी परिसरात रस्त्याची पाहणी करण्यात आली.
सदर पाहणीसाठी धाराशिव आगाराचे वाहतूक निरीक्षक धन्यकुमार कानडे, चालक श्री. व्ही. एन. वाघे व चालक पी. बी. मोरे हे एसटी बस घेऊन घटनास्थळी आले होते. त्यांनी संपूर्ण मार्गाची व रस्त्याची बारकाईने पाहणी केली.
पाहणीदरम्यान वाणेवाडी व सावंतवाडी क्र. २ च्या दरम्यान असलेल्या पाटबंधारे विभागाच्या साठवण तलावाच्या कालव्यावर/ओढ्यावर पूल, पक्का बंधारा किंवा सिमेंट मोरी उपलब्ध नसल्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. ओढ्यातून एसटी बस नेणे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असल्याने, पूल झाल्याशिवाय या मार्गावरून बस सेवा सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याचे पाहणी अधिकारी श्री. कानडे यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाचा इशारा
१५ ऑगस्टला रोजी
उपोषणाच्या इशार्यानंतर महावितरण, रस्ते विकास विभाग व पाटबंधारे विभाग यांना माहिती देऊनही आज १४ ऑगस्ट उजाडला तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली नाही किंवा पुढील कामाबाबत कोणताही स्पष्ट अहवाल दिलेला नाही. एसटी प्रशासनाने पाहणी केली असली तरी इतर संबंधित प्रशासकीय विभाग सहकार्य करत नसल्याने आणि नागरिकांची गैरसोय दूर होत नसल्याने श्री. दयानंद भगवान बादगुडे यांनी १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाचा लढा देण्याचा ठाम निर्धार केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते दयानंद बादगुडे यांची प्रतिक्रिया:
“सावंतवाडी क्र. १ व २, वाणेवाडी, या गावांतील विद्यार्थी व प्रवाशांची एसटीअभावी मोठी हाल होत आहे. धाराशिव आगाराच्या अधिकाऱ्यांनी बस आणून प्रामाणिकपणे पाहणी केली, त्याबद्दल आभार. परंतु महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. आज १४ तारीख संपत आली तरी त्यांनी पाहणी केली नाही. प्रशासनाच्या या असहकार्यामुळे मी १५ ऑगस्ट रोजी उपोषणाला बसण्यावर ठाम आहे.”
0
0
6
3
2
6


