ई-पेपरदेश-विदेशमहाराष्ट्र

पुणे संशोधन व नवसंकल्पनाची जननी – पानिपतकार ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील

पहिल्या नांदी संमेलनामध्ये साहित्यिक शि . द. फडणीस, यास्मिन शेख यांचा सन्मान

0 0 6 3 2 6
आजच्या काळातही ग्रंथसंवर्धनाची गरज : विश्र्वास पाटील
पहिले नांदी संमेलन : शि. द. फडणीस, यास्मिन शेख यांचा विशेष गौरव
जुन्या ग्रंथांच्या सुगंधातून, संशोधनातून मिळणारे धन महत्त्वाचे : विश्र्वास पाटील
पुणे : पुणे ही नवकल्पनांची जननी असून भाषा आणि विवेकाचा धडा देणाऱ्या मराठी साहित्य संमेमलनाची सुरुवात अखिल भारतीय राष्ट्रीय सभेच्या निर्मितीआधीच सहा-सात वर्षे आधी झाली हा सुवर्णयोग आहे. न्यायमूर्ती रानडे यांच्या सारख्या विद्वान व्यक्तींच्या संकल्पना आणि आराधनेतून साहित्य सभेची स्थापना झाली. ग्रंथलेखन, ग्रंथसंवर्धन आणि प्रसार ही तीन ध्येये समोर ठेवून मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ग्रंथसंवर्धनाची गरज आजच्या काळातही महत्त्वाची आहे. जुन्या ग्रंथांच्या सुगंधातून, संशोधनातून मिळणारे धन खूप महत्त्वाचे आहे. आपण ज्या परिसरात राहतो तेथील इतिहास, संस्कृती महत्त्वाची असून त्याचा विचारपूर्वक अभ्यास होऊन साहित्यनिर्मिती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि पहिल्या नांदी संमेलनाचे अध्यक्ष, पानिपतकार विश्र्वास पाटील यांनी केले.
पुण्यात जानेवारी २०२७ मध्ये होत असलेलया शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलानाच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देश-विदेशात ९९ नांदी संमेलने घेण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिले नांदी संमेलन शुक्रवारी (दि. १४) महाराष्ट्र साहित्य परिषद, समर्थ युवा फाऊंडेशन आणि महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेतर्फे टिळक रस्त्यावरील हिराबाग येथे आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी विश्र्वास पाटील अध्यक्षपदावरून बोलत होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, शंभराव्या संमेलनाचे संयोजक, समर्थ युवा फाऊंडेशनेचे अध्यक्ष राजेश पांडे, पहिल्या नांदी संमेलनाचे संयोजक डॉ. सागर देशपांडे तसेच मसापच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्यासह माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, भारत सासणे, डॉ. श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मंचावर होते. वयाची शंभर पार केलेले हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांचा विशेष सन्मान मूर्तीशास्त्राचे अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते करण्यात आला. मराठी भाषा व्याकरण क्षेत्रात योगदान दिलेल्या यास्मिन शेख यांचाही या निमित्ताने गौरव करण्यात आला आहे.
विश्वास पाटील पुढे म्हणाले, साहित्यिक समाजधुरीणांनी सर्वसामान्य वर्गाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आज या देशातील भांडवलदार, राजकीय पक्षांचे, गटांचे सर्व नेते आपल्या मुलाबाळांच्या प्रेमामध्ये एवढे दंग आणि गुंग झालेले दिसतात की, सर्वसामान्यांनाही मुले आहेत याचे त्यांना भानही राहिलेले नाही. अशा परिस्थितीत सर्वसामान्य मुले रस्त्यावर येणे यासारखा प्रकार घडताना दिसत आहे. इतिहासाचे परिशीलन करताना आपल्याकडे आणि परदेशात काय घडले याचा संशोधनात्मक इतिहास लिहिणे आवश्यक आहे. आज नालंदा आणि तक्षशील विद्यापीठाऐवजी ‘व्हॉटसॅप’ युनर्व्हसिटी मोठी झालेली दिसते. यात अनेकदा इतिहासाबद्दल चुकीची माहिती सांगितली जाते. त्यामुळे सोशाल मीडिया आहे की सोशल बिघाडी आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. साहित्य संमेलनांना गर्दी होते; परंतु इतर वेळेला भाषेचा किंवा संस्कृतीचा विचार करायला राजकारणी मंडळी हजर राहत नाहीत. यातूनच संस्कृती आणि भाषेची गती थांबविली गेली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे प्रतिबिंब साहित्यात उतरले पाहिजे. जेथे स्त्री शिक्षणाची तुतारी फुंकली गेली तेथे आज स्त्री रक्षणाची तुतारी नव्याने फुंकण्याची वेळ आली आहे. नांदी संमेलनांची संकल्पना चांगली आहे; परंतु येथे फक्त नांदी संमेलने न भरविता पुस्तकांच्या दुकानांची मुहुर्तमेढ रोवणे आवश्यक आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यशात पत्नी, मुलींचे योगदान मोलाचे : शि. द. फडणीस..
सत्काराला उत्तर देताना शि. द. फडणीस म्हणाले, शंभराव्या साहित्य संमेलनाची आज नांदी होत आहे याचा आनंद आहे. शंभर वर्षांच्या आठवणीचे दृश्य लक्षात घेतले तर माझा अनेक उपक्रमांमध्ये सहभाग होता. माझ्या यशामागे माझी दिवंगत पत्नी शकुंतला हिचे योगदान मोलाचे आहे. मी जरी प्रकाशझोतात असलो तरी माझ्या पाठीमागे कन्या लीना व रूपा यांचे मोलाचे सहकार्य आहे.
मराठी भाषेसाठी पंचसूत्री : राजेश पांडे…
राजेश पांडे म्हणाले, ९९ संमेलनांनी मराठी भाषेला खूप काही दिले याचे परीक्षण करताना मराठी साहित्याला पुढील शंभर वर्षांसाठी आपण कुठे घेऊन जाणार आहोत याविषयी चर्चा होणे महत्त्वाचे आहे. साहित्य संमेलन हे फक्त तीन-चार दिवसांचे आयोजन नसते तर तो विचारमंच, चर्चेचे स्थान असते. लेखक आणि वाचक यांना जोडणारे माध्यम असलेले साहित्य संमेलन समाजाच्या वैचारिक दिशेला आकार देणारे व्यासपीठ आहे. साहित्य संमेलनांच्या माध्यमातून मराठी साहित्याचा आवाज महाराष्ट्र, देशाच्या सीमेपलिकडेही गेला आहे. त्यामुळे मराठी साहित्याला भौगोलिक सीमा राहिलेल्या नाहीत. जिथे जिथे मराठी शब्द गेला आहे तिथे तिथे मराठी साहित्याची ज्योत पेटलेली दिसते. शंभरावे साहित्य संमेलन पुढील शंभर वर्षांची दिशा ठरविणारे झाले पाहिजे या करिता आम्ही अखंडितपणे कार्यरत आहोत. मराठीला आजच्या शतकाची भाषा बनविण्याचा उद्देश असून भौतिक, अर्थशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ विज्ञान, संविधान यांचे वाचन देखील मराठी व्हावे, जगाचे ज्ञान मराठी भाषेतून आत्मसात करावे यासाठी प्रयत्नशील असून मराठीला साहित्य भाषेकडून ज्ञानभाषेकडे नेण्याचा मानस आहे. मराठी भाषेत अधिकाधिक ज्ञाननिर्मिती, मराठी भाषेच्या डिजिटल भवितव्याचा विचार, युवा पिढीला मराठी भाषेशी जोडण्याचा प्रयत्न, जगभर मराठी भाषा पोहोचविण्यासाठी कार्य आणि मराठी भाषेला ज्ञान, संशोधन आणि नवसंकल्पनांची भाषा बनविण्यासाठी कटिबद्ध असल्याची पंचसूत्री त्यांनी मांडली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेला शिस्तबद्ध आकार देणाऱ्या गं. ना. जोगळेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदारांजली वाहून योगेश सोमण म्हणाले, शंभराव्या साहित्य संमेलनास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार होऊयात.
सागर देशपांडे म्हणाले, प्रख्यात तत्वज्ञ, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रबोधनपुरुष म्हणून ओळख असलेल्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात हिराबागेत पहिले ग्रंथकार संमेलन झाले होते. त्या संमेलनाची स्मृती म्हणूनच हे पहिले नांदी संमेलन येथे आयोजित करण्यात आले.
नांदी संमेलनांमधूनही ज्ञानप्राप्ती : डॉ. स्वाती महाळंक…
डॉ. स्वाती महाळंक म्हणाल्या, ग्रंथप्रचाराच्या उद्देशाने सुरू झालेले कार्य आता शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापर्यंत पोहोचले आहे. हे संमेलन दिमाखदार करण्याबरोबरच अधिकाधिक अर्थपूर्ण करण्यासाठी नांदी संमेलनांची संकल्पना साकारली असून त्याची आज प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. ही नांदी संमेलने देखील साचेबद्ध न होता विविध विषयांना समर्पित असून या माध्यमातून विविध विषयांचे विचारमंथन होऊन साहित्यप्रेमींना त्यातून काहीतरी आस्वादक आणि अभ्यासक ज्ञान प्राप्त व्हावे असा प्रयत्न आहे.
OLYMPUS DIGITAL CAMERA
मराठी भाषेसाठी अखंडित कार्य : यास्मीन शेख…
दृकश्राव्य माध्यमातून यास्मीन शेख यांचा संदेश ऐकविण्यात आला. त्या म्हणाल्या मी वाङ्‌मयनिष्ठ असून मराठी भाषेवर माझे नितांत प्रेम आहे. तिचा स्वीकार आणि विकास व्हावा म्हणून मी अखंडितपणे कार्य केले आहे. मराठी ही माझीच भाषा आहे. शंभरावे साहित्य संमेलन सुंदर, परिपूर्ण आणि सगळ्यांना आवडेल असे व्हावे या शुभेच्छा.
मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनीही दृकश्राव्य माध्यमातून उपक्रमास शुभेच्छा दिल्या. सुरुवातीस दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पहिल्या ग्रंथकार संमेलनाची मुहूर्तमेढ कशी रोवली गेली याविषयीचा नाट्यप्रवेश तसेच संवाद पुणे निर्मित सत्यशोधक महात्मा हा दीर्घांक सादर करण्यात आला.
शंभरी पार केलेल्या संस्थांचा सन्मान..
शंभरी पार केलेल्या संस्थांचा या वेळी ग्रंथभेट देऊन सन्मान करण्यात आला. डेक्कन कॉलेज पुणे, टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट, वक्तृत्वोत्तेजक मंडळी पुणे, पुणे नगर वाचन मंदिर, भारत इतिहास संशोधन मंडळ, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, वेदशास्त्रोत्तेजक सभा, राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे मराठी ग्रंथालय, पुणे सेवासदन, सर्व्हटंस्‌ ऑफ इंडिया, पुणे सार्वजनिक सभा, महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा, महात्मा फुले वस्तू संग्रहालय, भरत नाट्य मंदिर, आनंदाश्रम, हरीकीर्तनोत्तेजक संस्था तसेच राज्य मराठी विकास संस्थेचे श्यामकांत देवरे, सचिन सानप यांचा गौरव करण्यात आला. अनिरुद्ध दडके यांनी सूत्रसंचालन केले तर सुनील महाजन यांनी आभार मानले. फोटो ओळ : शि. द. फडणीस यांचा गौरव करताना डॉ. गो. बं. देगलूरकर.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 3 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे