ई-पेपरकृषीवार्ता
सौ.शहाणाज पठाण, डॉ. दामिनी पारवे, सौ जयश्री पौळ, सोनाली यादव यांना प्रसिद्ध वक्ते नितीन चंदनशिवे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे करण्यात आला स्त्रीशक्तीचा सन्मान

0
0
7
0
4
6
गाव बदलतंय, नातीही बदलतायत; कौटुंबिक एकी जपण्याचे चंदनशिवेंचे आवाहन
आरळी येथे कै. इंदुमती उकरंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ग्रामकन्या कृतज्ञता व आदर्श माता पुरस्कारांचे वितरण
तुळजापूर दि २० अनिल आगलावे
बदलत्या काळानुसार गावातील सामाजिक जीवनशैली आणि नातेसंबंधांमध्येही बदल होत आहेत. या बदलांचा स्वीकार करताना कुटुंबातील प्रेम, संवाद, जिव्हाळा आणि परस्परांचा आदर कायम ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने एकमेकांना समजून घेत सुख-दुःखात साथ दिली, तर कौटुंबिक एकी अधिक मजबूत राहील. संस्कार आणि संवादाच्या बळावर कुटुंबाची वीण घट्ट ठेवण्याचे आवाहन दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी केले.
“आजच्या बदलत्या जीवनशैलीत कुटुंबव्यवस्थेत अनेक बदल होत आहेत. मात्र आधुनिकतेच्या प्रवाहात संस्कारांची मुळे कमकुवत होऊ देता कामा नयेत. घरातील ज्येष्ठांचा आदर, परस्परांतील प्रेम, संवाद आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची भावना जपली, तर कुटुंबातील नाळ अधिक घट्ट राहील. संस्कारक्षम कुटुंबातूनच सुदृढ समाजाची निर्मिती होते.”असे मत दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी व्यक्त केले.
कै. इंदुमती अशोकराव उकरंडे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त ग्रामकन्या कृतज्ञता पुरस्कार व आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. मातृत्व, कुटुंबसंस्कार, सामाजिक बांधिलकी आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कांचन उकरंडे होत्या. प्रसिद्ध दंगलकार व सामाजिक विषयांवर परखड भाष्य करणारे व्याख्याते नितीन चंदनशिवे यांनी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. रायाप्पा कटके आणि मन्मथ उकरंडे यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात सौ. शहनाज मूनवर पठाण यांना त्यांच्या मातृत्वातील योगदानाबद्दल आदर्श माता पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच डॉ. दामिनी दादाराव पारवे, सौ. जयश्री सदाफूले- पोळ आणि सोनाली रमेश यादव यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ग्रामकन्या कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कै. इंदुमती उकरंडे यांच्या स्मृती जपत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याचा उपक्रम पुढे सुरू ठेवणे हीच त्यांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला. पुरस्कारांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम होत असल्याने या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे निवेदन तानाजी म्हेत्रे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. शिवाजी उकरंडे यांनी केले, तर प्रशांत उकरंडे यांनी आभार मानले.
0
0
7
0
4
6



