अखिल भारतीय मराठी गझल परिषद अध्यक्षपदी नाना लोडम, सचिवपदी दास पाटील
अखिल भारतीय मराठी गझल परिषद पुढील वर्षीपासून आयोजित करणार,एल्गार मराठी गझल संमेलन

गझलकट्टा ते अखिल भारतीय मराठी गझल परिषद व्हाया एल्गार मराठी गझल संमेल
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गझलकट्टयाची सुरुवात डोंबिवलीपासून झाली. त्यानंतर तीन वर्षांचा खंड पडला. पुढची सलग तीन वर्षे पुन्हा संमेलनात गझलकट्ट्याचे आयोजन स्थानिक आयोजक आणि महामंडळाकडून करण्यात आले. परत अमळनेरमध्ये गझलकट्ट्याला नकारघंटा मिळाली. साहित्य महामंडळाच्या धरसोड वृत्तीने असे भविष्यात पुढेही होऊ शकते, याची जाणीव झाली. त्यामुळे कुणावर अवलंबून न राहता आपले स्वतःचे संमेलन आपणच का घेऊ नये या विचारातून सर्व गझलकवींनी एकत्र येऊन गझलकवींसाठी, गझलेसाठी एक स्वतंत्र संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन अमळनेर येथे पार पडले.
अमळनेरच्या पहिल्या संमेलनापासूनच गझलेसाठी, गझलकवींसाठी एक स्वतंत्र शिखर संस्था असावी, असा मुद्दा पुढे आला होता. खरंतर अशी शिखर संस्था अंबाजोगाई येथील संमेलनापर्यंत व्हावी हे अपेक्षित होते. परंतु काही कारणामुळे ते त्यावेळी होऊ शकले नाही. मात्र यंदाच्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनापर्यंत गझलेसाठी गझलेच्या विकासासाठी हक्काचे व्यासपीठ असावे, एक स्वतंत्र संस्था असावी आणि त्याची घोषणा अमरावती येथील गझल संमेलनात व्हायला हवी या दृष्टीने काम सुरू केले गेले. संस्थेची घटना, नियमावली तयार करणे, संस्थेची नोंदणी करणे इत्यादी प्रक्रिया वेगाने सुरू केल्या गेल्या आणि त्या जवळपास पूर्ण झाल्या. मागील तीनही संमेलने वेगवेगळ्या संस्थांच्या बॅनरखाली आयोजित करण्यात आली होती. मात्र पुढील वर्षीपासून भविष्यातील सर्व संमेलने एकाच संस्थेच्या नावाखाली आयोजित करण्याचे ठरले आणि त्या दृष्टीने अखिल भारतीय मराठी गझल परिषद स्थापन करण्याचा निर्णय झाला.
अमरावती येथे पार पडलेल्या तिसऱ्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनात अखिल भारतीय मराठी गझल परिषदेची अधिकृत घोषणा करण्यात आली. वर्षाकाठी एक संमेलन घेणे हा एवढाच उद्देश न ठेवता सातत्याने गझलेला पोषक, पूरक, विकासात्मक उपक्रम आयोजित करण्यासाठी, गझलेची चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित करणे, परिसंवाद, परिचर्चा यांचे आयोजन करणे, नवीन लिहिणाऱ्या लोकांना हक्काची व्यासपीठ मिळवून देणे, गझलविधेवर संशोधनात्मक काम पुढे नेणे, महिला गझल संमेलन, विभागीय गझल संमेलने आयोजित करणे, विभागीय पातळीपासून जिल्हानिहाय कार्यकारिणी गठित करणे आणि त्याद्वारे विविध उपक्रम राबवणे, राज्याबाहेरील गझलकवी, गझलसाठी कार्य करणाऱ्या संस्था यांना संलग्नता देऊन महाराष्ट्राबाहेर गझलेसाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना सहकार्य करत गझलविधेची व्याप्ती वाढवणे, उत्तम गझल लेखन करणाऱ्या गझलकवींना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच ज्येष्ठ गझलकवींचा उचित सन्मान करण्यासाठी विविध पुरस्कार प्रदान करणे अशा विविध स्वरूपाचे कार्य या परिषदेच्या माध्यमातून राबवण्याचा मानस ठेवून या संस्थेची स्थापना करण्यात आली.
मराठी गझल खऱ्या अर्थाने ज्यांनी जनमानसात पोहोचवली, गझलेच्या प्रचार आणि प्रसारासाठी ज्यांनी हयातभर कष्ट घेतले, त्या कविश्रेष्ठ सुरेश भट साहेबांच्या गावात, अमरावतीत या अखिल भारतीय मराठी गझल परिषदेच्या स्थापनेची उद्घोषणा होत आहे, याहून दुसरा आनंदाचा क्षण नाही.
अखिल भारतीय मराठी गझल परिषदेच्या अध्यक्षपदी नाना लोडम यांची अध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात आली. उपाध्यक्षपदी दगडू दादा लोमटे, माधुरी चव्हाण जोशी यांची निवड जाहीर करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणून नितीन देशमुख, सचिव म्हणून मी, दास पाटील आणि कोषाध्यक्ष म्हणून विश्वास कुलकर्णी यांची नावे जाहीर करण्यात आली. परिषदेचे कार्यकारणी सदस्य म्हणून शिव डोईजोडे, प्रमोद खराडे, संजय इंगळे तिगावकर, रेणुका पुरोहित, वसंत शिंदे, विशाल राजगुरू, सदाशिव सूर्यवंशी यांच्या नावांची उद्घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर परिषदेच्या बोधचिन्हाचे अनावरण शाहीर शाहीर सुरेशकुमार वैराळकर आणि सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
आधीच्या तिन्ही गझल संमेलनाला सर्व गझलकवींचा भरभरून प्रतिसाद लाभला. त्यांच्या सहकार्यामुळे ही सर्व संमेलने यशस्वी झाली. या अखिल भारतीय मराठी गझल परिषदेच्या माध्यमातून एक हक्काची संस्था सर्व गझलकवींना मिळत आहे.
अखिल भारतीय मराठी गझल परिषदेच्या कार्यकारणी मंडळाची मुदत ५ वर्षांसाठी असेल. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निवडणूक घेतली जाईल. त्यात सर्व आजीव सदस्यांना मतदानाचा अधिकार असेल.
संस्थेची सदस्य नोंदणी प्रक्रिया लवकरच जाहीर करण्यात येईल. परिषदेचे आजीव सदस्यता शुल्क रु.२५००/- असणार आहे. नोंदणी करण्याबाबत अधिक माहिती लवकरच दिली जाईल.
भविष्यात होणारी सर्व संमेलने, उपक्रम अखिल भारतीय मराठी गझल परिषदेच्या अंतर्गत आयोजिले जातील.
भविष्यातील कार्य अधिक सुसूत्रतेने आणि नियोजनबद्ध पद्धतीने याद्वारे नक्कीच होईल. सर्व उपक्रम काटेकोर पद्धतीने, सर्व गझलकवींच्या हिताला प्राथमिकता देऊन पार पाडले जातील.
याचबरोबर सदस्य असलेले गझलकवी, रसिक यांच्याकडूनही एक शिखर संस्था म्हणून परिषदेला सहकार्य करण्याची भूमिका अपेक्षित आहे. परिषदेच्या उद्देशाला आणि हिताला प्राथमिकता देऊन संपूर्ण कार्यकारिणी आणि सर्व सदस्य एक दिलाने, एक मताने, एक विचाराने कार्य करत परिषदेची व्याप्ती वाढवणे हेही अपेक्षित आहे.
एकूणच गझलविधेसाठी सकारात्मक भूमिका ठेवून विकासात्मक, संघटनात्मक, ठोस स्वरूपाचे कार्य ही परिषद कार्य करत राहील, अशी ग्वाही परिषदेचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकारिणी मंडळाच्या वतीने मी देतो.



