क्रिडा व मनोरंजनब्रेकिंग
मुलांमध्ये नाट्यत्मकता रुजविण्याच्या चळवळीत शिक्षक-पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा : मिलिंद सबनीस
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण
0
0
1
8
1
2
पुणे : माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी राजा नातू करंडक एकांकिका स्पर्धा ही पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा पाया आहे. मुलांना या स्पर्धेत उतरविण्याआधी महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे घेतल्या जाणाऱ्या कार्यशाळांचा शिक्षकांनी आवर्जून लाभ घ्यावा, ज्या योगे नवनवीन विषय, दिग्दर्शनातील बारकावे, मुलांकडून काय करून घ्यावे याची सखोल माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचू शकेल आणि या स्पर्धेला अपेक्षित दर्जा प्राप्त होईल, असे मत वन्दे मातरम्चे अभ्यासक मिलिंद प्रभाकर सबनीस यांनी व्यक्त केले. मुलांमध्ये नाट्यत्मकता रुजविण्याच्या चळवळीत शिक्षक आणि पालकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असेही ते आवर्जून म्हणाले.
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. १) भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. पारितोषिक वितरण मिलिंद प्रभाकर सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुहास जोशी, उद्योजक मकरंद केळकर मंचावर होते. राजू बावडेकर, केतन क्षीरसागर, जयंती फडके यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. सुरुवातीस स्पर्धेत प्रथम आलेली ‘८८ आर ए’ (एस. पी. एम. इंग्लिश स्कूल, पुणे) आणि नावीन्यपूर्ण व कल्पक सादरीकरणाचे पारितोषिकप्राप्त एकांकिका ‘जननी जन्मभूमीश्च’ (माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय, पुणे) यांचे सादरीकरण झाले.
पारितोषिक स्वीकारल्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘आव्वाज कुणाचा’, ‘एसपीएम एसपीएम’, ‘वन्दे मातरम्’, ‘वुई आर द बॉईज ऑफ मॉडर्न’ अशा घोषणा देऊन नाट्यगृह दणाणून सोडले. मुलांना आपण जसे घडवू त्यापेक्षा ती उत्तम प्रकारे घडत असतात, असे सांगून मिलिंद सबनीस म्हणाले, स्पर्धेआधी पालक तसेच रंगभूमीच्या भाविकांनी तज्ज्ञांकडून योग्य ते मार्गदर्शन घेतल्यास एकांकिकांचे सादरीकरण प्रभावीपणे घडेल.
परीक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना राजू बावडेकर म्हणाले, अभिनयात प्रामाणिकपणा असल्यास कथा, संहिता तसेच दिग्दर्शकाचे काम प्रेक्षकांपर्यंत उत्तमरित्या पोहोचते. स्पर्धेत एकांकिका सादर करताना विषयनिवड महत्त्वाची ठरते तसेच भूमिकेची पार्श्वभूमी समजावून घेवून मुलांच्या वयानुरूप विषय निवडला जावा.
मकरंद केळकर यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचे स्वागत डॉ. सुहास जोशी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी वाघ यांनी केले. निकाल वाचन ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी केले तर आभार अमृता पटवर्धन यांनी मानले.
0
0
1
8
1
2


