क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

निरामय संगीत सोहळ्यात डॉ. रेवा नातू, जयंत केजकर, शुभदा पराडकर यांचे गायन

स्पष्टोच्चार आणि ओजस्वी गायनाने रसिक भारावून गेले

0 0 1 8 1 2

पुणे : डॉ. रेवा नातू यांचे लयबद्ध आणि भावपूर्ण गायन, जयंत केजकर यांचे शांत, सुरेल प्रभावी सादरीकरण तर विदुषी शुभदा पराडकर यांच्या दमदार, परिपक्व आणि ओजस्वी गायनाने रसिकांची सायंकाळ संस्मरणीय ठरली.

निमित्त होते डॉ. प्रकाश कुलकर्णी आयोजित निरामय संगीत सोहळ्याचे! भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वि. का. राजवाडे सभागृहात संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मैफलीची सुरुवात डॉ. रेवा नातू यांनी राग मुलतानीमधील ‘गोकुल गाव के छोरा रे’ या बंदिशीने केली. द्रुत लयीत ‘नैनन मे आन बान’ ही रचना सादर करत राग देसमधील ‘होरी खेलन को चले कन्हैंया’ या बंदिशीने मैफलीची सांगता केली. राग विस्तारातील स्पष्टता आणि अभ्यासपूर्ण मांडणीतून त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली.

यानंतर जयंत केजकर यांचे सुश्राव्य गायन झाले. त्यांनी ‘आजु हो बधायो बाजो’ ही राग श्रीमधील बंदिश ऐकवून द्रुत लयीत ‘चटपटी लागी रही’ ही रचना प्रभावीपणे सादर केली. राग केदारमधील ‘जाके कान्हा महेल कित सोया’ या रचनेनंतर ‘कान्हा रे नंद नंदन’ या रचनेने मैफलीची सांगता केली.

विदुषी शुभदा पराडकर यांनी आपल्या मैफलीची सुरुवात ‘मालगुंजी’ या अनवट रागाने केली. झुमरा तालातील पारंपरिक बडा ख्याल ऐकविताना ‘बनमें चरावत गैया’ ही पारंपरिक बंदिश सादर करून ‘रैन कारी डरावन लागी’ ही रचना सादर केली. त्यानंतर राग जयत कल्याणमधील ‘पपिहा ना बोल’ ही पारंपरिक बंदिश ऐकवून ‘ए मोरे मनकी बात’ ही रचना प्रभावीपणे सादर केली. कार्यक्रमाची सांगता राग सोहोनीमधील खादीम हुसेन खाँसाहेब रचित ‘सजन तुम जरा बोलो बोलो’ या छोटा ख्यालने केली. ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर घराण्यांचा मिलाफ असणारी रागदारीची प्रगल्भ मांडणी, लयकारी व तानांचे विवध प्रकार, स्पष्टोच्चार आणि ओजस्वी गायनाने रसिक भारावून गेले.

सुरुवातीस डॉ. प्रकाश कुलकर्णी यांनी ‘परम विमल तुझे स्मरण’ हे ईशस्तवन सादर केले.

कलाकारांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), प्रणव गुरव (तबला) यांनी समर्पक साथसंगत करताना ताल, सूर आणि रागविचारांची अनोखी देवाण-घेवाण करत मैफलीत रंग भरले. जयंत केजकर यांना विनय कोहाड, कन्हैया भोसले तर विदुषी शुभदा पराडकर यांना मुग्धा वैशंपायन, रश्मी पराडकर-सुळे, सावनी गोगटे (तानपुरा, सहगायन) साथसंगत केली.कलाकारांचा सत्कार सुप्रसिद्ध तबलवादक पंडित रामदास पळसुले यांच्या हस्ते करण्यात आला.

फोटो ओळ : डॉ. रेवा नातू जयंत केजकर विदुषी शुभदा पराडकर डॉ. प्रकाश कुलकर्णी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे