ई-पेपरमहाराष्ट्रसंपादकीय

सत्तेचा मोह सुटत नसल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून विलनीकरणाची पराकाष्टा ?

ही चर्चा अजित पवार असताना का झाली नाही ? जाणकारांचा सवाल

0 0 1 8 1 2

‘अराजके जनपदे स्वयमेव नश्यति’

ज्या घडामोडी तातडीने घडल्या आहेत, त्यावरून शरद पवारांनी सगळं समजून घेतलं आहे, दोन राष्ट्रवादीचा विलीनीकरण जवळपास अशक्य आहे ?

राजकारणावर विदुर आणि चाणक्य ह्यांनी अप्रतिम असं भाष्य केलंय! ह्यातून शिकायच्याच असतील तर असंख्य गोष्टी शिकता येतात, आचरणात आणता येतात! राजकारण कुणासाठीही थांबत नसतं, ते अविचल असत, अविनाशी असतं, आणि म्हणूनच सर्वसामान्य लोकांना ते क्रूर वाटतं! पांडव त्यांच्या अज्ञातवासात असतांना जेंव्हा भीमाने मत्स्य देशाच्या सेनापती ‘कीचक’ ची हत्या केली तेंव्हा ही संधी साधता येईल ह्या उद्देशाने ‘हस्तिनापुर’च्या कौरव सैन्याने सापळा रचून मत्स्य देशावर आक्रमण केलं होतं! आक्रमणाचा उद्देश पांडवांचा अज्ञातवास भंग करणे हा असला तरीही त्याला मुलामा हा महाबली कीचक वधानंतर मत्स्य देश कमजोर झालाय आणि त्याला आपल्या ‘पंखाखाली’ घेणं हे ‘क्षत्रिय’ राजकारणाला अनुसरून होतं! ही नीती आजही लागु होते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात ह्यापूर्वी हे झालेलं बघितलंय!

कालच्या दादांवरील श्रद्धांजली लेखात मी राजकारणाचा उल्लेख बुद्धिबळाचा पट म्हणून केला होता, आणि दादांना ‘पवार राजकारणाचे’ ‘राजा’ म्हटलं होतं. राजाच गेलाय म्हटल्यावर प्रचंड उलथापालथ होणार, शह काटशहच्या राजकारणाला ऊत येणार आणि ह्यातून कुणीच सुटणार नाही ह्याचाही अंदाज वर्तवला होता. अजितदादांचे दिवस कार्य पूर्ण होण्याचीही वाट ह्याकरिता बघितली जाणार नाही किंबहुना बघितली गेली नाहीय! ज्या तत्परतेने शरद पवार ह्यांच्या पक्षातील नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज बोलुन दाखवली नव्हे त्याला दादांच्या ‘शेवटच्या इच्छेचा’ मुलामा चढवला गेला, ज्या तत्परतेने पटेल, भुजबळ, तटकरे, मुंडे ही राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची मंडळी मुख्यमंत्र्यांना भेटायला काल ‘वर्षावर’ येऊन गेली, ज्या तत्परतेने आज शरद पवारांचं स्टेटमेंट आलंय, ज्या पद्धतीने ‘काही लोकांचा’ गेल्या २-३ दिवसांतला वावर ठळकपणे नजरेत भरतोय त्यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते “अराजके जनपदे स्वयमेव नश्यति”! राजाविना प्रजा पोरकीच असते. त्याच्याकरिता नवीन राजा आणि त्याचा राज्याभिषेक होणं हे अगत्याचं आहे! अजित दादांच्या अंत्यविधीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ह्यांनी येणं, त्यानंतर राष्ट्रवादीच्या चौकडीने तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेणं, आणि दिवसाच्या शेवटी श्रीमती सुनेत्रा पवार ह्यांचं नाव तत्परतेने पुढे येणं त्याकरिता त्यांनी होकार दिलाय पासुन त्यांचा शपथविधी होणार इथपर्यंत येणाऱ्या बातम्या कशाचं द्योतक आहे? हे दादांचं राज्य वाचवण्याच्या धडपडीचे द्योतक आहे!

हाच घटनाक्रम भारतीय राजकारणाने १९८७ ला बघून झालाय. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.जी.रामचंद्रन अर्थात एमजीआर ह्यांचं निधन झालं. एमजीआर ह्यांच्या चित्रपटातील, पक्षातील सहयोगी जे.जयललिता ह्यांना एमजीआर ह्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शनही घेऊ दिलं गेलं नाही. त्यांच्या अंतिम दर्शनाकरिता आतुर जयललिता एमजीआर ह्यांचं पार्थिव घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या मागे अक्षरशः अनवाणी पायाने धावल्या, त्यांच्या चितेपाशी ती थंड होईपर्यंत शून्यात नजर ठेवून बसल्या होत्या! पुढे जयललिता ह्यांना एमजीआर ह्यांच्या पक्षातून हाकलण्यात आलं, एमजीआर ह्यांच्या पत्नी व्ही.एन.जानकी नाखुशीने आणि समर्थकांच्या रेट्यामुळे का होईना काही आठवड्यांकरिता मुख्यमंत्री बनल्या. पुढे जयललिता ह्यांनी त्याच एमजीआर ह्यांच्या खऱ्या राजकीय वारसदार आहेत हे अक्षरशः झगडून सिद्ध केलं आणि विषय संपला. इतिहासात डोकावण्याचं कारण इतिहासातून धडे शिकता येतात. त्यामुळे इतिहासाचा संदर्भ बघितला तर राजकारणात ‘तग’ धरणं जितकं महत्वाचं असतं त्याहून अधिक राज्यावर दावा ठोकून त्यावर नियंत्रण मिळवणं हे अधिक महत्वाचं असतं!

गेल्या दोन दिवसांत एक कुजबुज सारखी होतेय, दादांनंतर येणारी त्यांच्या पक्षातली नेत्यांच्या चौकडीला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचं मर्जर नकोय! अर्थात कारणं स्वाभाविक असावी, ते झालं तर त्यांचं महत्व, वजन कमी होईल वगैरे वगैरे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षातून मर्जर बद्दल जितकं बोललं जातंय ते दादांच्या पक्षातून बोललं जात नाहीय, अर्थात ज्याची निकड जास्त त्याचे प्रयत्न जास्त! जर मर्जर झालंच तर फायदा आणि नुकसान बघूनच होणार! ह्या सगळ्या कोलाहलात एक गोष्ट सगळेच विसरलेत, मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विभाजन करणारे दादाचं होते आणि त्यांना स्थानिक निवडणुकांपुरते एकत्र आणणारेही दादाचं होते! दोन्ही पक्षांना एकत्र आणतांना जो रोडमॅप त्यांनी आखला असेल त्यात त्यांनी कुठल्या कारणांसाठी पक्ष फोडला होता त्याचा त्या रोडमॅपवर प्रभाव नसेल? अर्थात असेल! ते अजित पवार होते हे विसरून चालेल? आणि हेही विसरून चालणार नाही अजित पवारांचं साम्राज्य, त्यांचा पक्ष, त्यांचे कार्यकर्ते, नेते एकत्र ठेवायचे असतील तर अजित पवार ह्यांच्या ‘स्टाईल’नेच राजकारण करावं लागेल. लांडग्यांना ताब्यात ठेवायचं असेल तर सिंहाचं काळीजचं लागतं. सध्याच्या घडामोडी बघता दादांचं साम्राज्य आणि पक्ष विखुरला जाऊ नये ह्यासाठी ऑरगॅनिकली सुनेत्रा वहिनींचं नाव पुढे येणं हेच ह्या सगळ्या कोलाहलाला थोपवु शकेल! बाकी भविष्यात ते कितपत यशस्वी ठरेल ह्याचा निर्णय भविष्यावर सोडूयात!

एक निरीक्षण सांगतो सुनेत्रा पवार ह्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यापर्यंत शरद पवारांची चाकरी करण्यात धन्यता मानणारी काही माध्यमं ‘बघा दुःख विसरून शरद पवार कसे बारामतीच्या विकासासाठी कामाला लागेलसुद्धा’ अशा आशयाचा बातम्या फिरवत होते, ही तीच मंडळी होती ज्यांनी ‘दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एकत्र यावं हीच दादांची अंतिम इच्छा होती’ ह्या बातम्या त्यांच्या अपघाती निधनाला काही तासही उलटत नाही तोच पेरल्या होत्या होत्या! तीच मंडळी आणि माध्यम आज ‘दादांचे दिवसकार्य ही पूर्ण झाले नाहीत ह्यात सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतायत हे तुम्हाला योग्य वाटतं का?’ हा पोल त्यांच्या चॅनल्स वर चालवतायत! ह्याला नीचपणा नाहीतर काय म्हणणार? अर्थात स्वतः शरद पवार ह्यांनी २०२४ लोकसभा निवडणुकीच्या वेळी श्रीमती सुनेत्रा पवार ह्यांचा उल्लेख ‘बाहेरून आलेले पवार’ असा केला होता! त्याच शरद पवारांनी आज ‘आम्हाला सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत ह्याबाबत माहिती नाही, कळवण्यात आलं नाहीय, त्यामुळे आम्ही शपथविधीला जाणार नाही’ अशी भूमिका घेत असतील तर त्यांच्या चेल्यांनी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतायत हे तुम्हाला योग्य वाटतं का? असा नेरेटिव्ह चालवणं हे फार छोटं कृत्य आहे बरोबर?

ह्या कोलाहलावर सगळ्यात संयत प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस ह्यांची होती! “कुणाला उपमुख्यमंत्री करायचं हा सर्वस्वी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा निर्णय आहे, आम्ही सत्तेत एकत्र आहोत जे नाव त्यांच्याकडून पुढे येईल त्याच्यावर आम्ही सरकार म्हणून योग्य निर्णय घेऊ”! देवेन दा च्या लौकिकाला शोभेल अशी प्रतिक्रिया होती! खरं तर आज त्यांच्या मनात काय घालमेल सुरु असेल हे साक्षात ब्रह्मदेव सोडून कुणीच सांगु शकणार नाहीत! अजित दादा देवेंद्र ह्यांचे जिवलग मित्र होते, दोघांनीही शेवटपर्यंत मैत्री जपली आणि पाळली ही, दादा गेल्याचं दुःख सुनेत्रा पवार आणि देवेंद्र ह्यांच्या डोळ्यांत दिसत होतं, त्यामुळे दादांनंतर त्यांच्या पक्षाला सावरण्याचं काम जसं सुनेत्रा पवार ह्यांचं आहे त्याच प्रकारे मैत्री कर्तव्याखातर ते कुठेतरी देवेंद्र ह्यांनी आपलं मानल्यास मला आश्चर्य वाटणार नाही! मैत्री जपणाऱ्या देवेंद्र ह्यांना जवळून बघितलंय, माझ्या मामाचं अपघाती दुःखद निधन झाल्यावर लहानपणीच्या आपल्या जिवलग मित्रासाठी ढसाढसा रडणारा आणि पुढे मामाच्या कुटुंबाला धीर देणारा देवेन दा मी बघितलाय! त्यांच्यासाठी फार कठीण काळ आहे, तितकाच जबाबदारीचा काळ आहे, ते ही जबाबदारी उत्तमरित्या पेलतील ही खात्री आहे! फक्त ती पेलतांना त्यांना काय कसरत करावी लागणार आहे आणि किती हळुवारपणे हे करावं लागणार आहे हे त्यांचं त्यांनाच माहिती!

जाताजाता विदुरनीती मधील चार ओळी, ज्या विदुराने धृतराष्ट्रला सांगितल्या होत्या

अनाथा यत्र प्रजाः सर्वाः, न तत्र वसते श्रियः ।
अरक्षितं विनश्येत, राज्यं दण्डविवर्जितम् ॥

विदुरनीती असो वा चाणक्यनीती ह्यांतून बरंच शिकण्यासारखं आहे, राजकारण्यांसाठीही आणि राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांसाठीही!

#अजित_पवार #दादांनंतरचंराजकारण

✍🏻 प्रसाद देशपांडे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे