ब्रेकिंग
साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे शनिवार-रविवारी काव्य महोत्सवाचे आयोजन संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. सिसिलिया कार्व्हालो : गुरू ठाकूर यांचा कलादीप पुरस्काराने होणार गौरव

0
0
1
8
1
2
पुणे : कला, साहित्य क्षेत्रात १५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे दि. ३१ जानेवारी आणि दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी दोन दिवसीय काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध साहित्यिका प्रा. डॉ. सिसिलिया कार्व्हालो संमेलनाच्या अध्यक्ष असून संमेलनाचे उद्घाटन भाषा अभ्यासक डॉ. नीलिमा गुंडी यांच्या हस्ते होणार आहे. सुप्रसिद्ध कवी, गीतकार गुरू ठाकूर यांचा कलादीप पुरस्काराने गौरव केला जाणार आहे, अशी माहिती साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे आणि कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर यांनी आज (दि. २७) पत्रकार परिषदेत दिली. प्रतिष्ठानचे सल्लागार प्रसाद देशपांडे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
दोन दिवसीय काव्य महोत्सव सकाळी १० ते रात्री ८ या वेळात सदाशिव पेठेतील वि. का. राजवाडे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. गझल मुशायरा, कविता, बालगीतांचे सादरीकरण, परिसंवाद, कविसंमेलन असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम या निमित्ताने होणार आहेत. कवी ॲड. विलास अत्रे, वि. सु. चव्हाण, चिन्मयी चिटणीस, निरुपमा महाजन उपस्थित होते. संमेलनास सर्वांना विनामूल्य प्रवेश असणार आहे.
प्रा. डॉ. सिसिलिया कार्व्हालो सुप्रसिद्ध मराठी लेखिका, प्राध्यापिका आणि कवयित्री आहेत. वसईतील संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि मराठीच्या प्राध्यापिका असून मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पीचएडीसाठी मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या लेखनातून त्यांनी मराठी साहित्य आणि ख्रिस्ती समाजातील स्त्री-पुरुष संबंधावर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. ‘टिपंवणी’ या आत्मचरित्रासाठी त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशनाचा पुरस्कार मिळाला आहे. चर्चमध्ये स्त्रियांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवर डॉ. कार्व्हालो यांनी आवाज उठविला आहे.
संमेलनाचा उद्घाटन समारंभ शनिवार, दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ओंकार कोरडे, वि. सु. चव्हाण यांची प्रमुख तर धनंजय तांबेकर, ॲड. विलास अत्रे, डॉ. पं. संदीप अवचट यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.
दुपारी १:३० वाजता कलादीप पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला असून पुरस्काराचे वितरण डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांच्या हस्ते होणार आहे. पुरस्कार वितरण समारंभानंतर गुरू ठाकूर यांची मुलाखत डॉ. पं. संदीप अवचट घेणार आहेत. दुपारी ३:३० वाजता गझलकार भूषण कटककर यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा आयोजित करण्यात आला असून यात प्रमोद खराडे, शिवदादा डोईजोडे, डॉ. स्नेहल कुलकर्णी, श्याम खामकर, डॉ. माधुरी चव्हाण-जोशी, तेजस भातकुलकर, प्राजक्ता पटवर्धन, मीना शिंदे, राहुल कुलकर्णी, किरण वेताळ यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी ६ वाजता बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली ‘किलबिल किलबिल’ हा बाल कविता व गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून प्रांजली बर्वे व सहकलाकार सादरीकरण करणार आहेत.
रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ‘अक्षरवाटा २०२६’ या प्रातिनिधीक कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला असून अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध गझलकार रमण रणदिवे तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री प्रज्ञा महाजन उपस्थित असणार आहेत. त्यानंतर ‘अक्षरवाटा’ कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून ‘अक्षरवाटा’ काव्यसंग्रहातील कवितांचे वाचन संध्या वाघ, जयश्री श्रोत्रिय, शुभांगी पाठक, शैलजा किंकर, साधना शेळके, संध्या गोळे, डॉ. अरविंद वाघचौरे, प्रमोद पिंगळे, जयश्री देशकुलकर्णी, सुनेत्रा गायकवाड, योगेश काळे, विजय देव, मकरंद घाणेकर, मनीषा सराफ, निलिमा फाटक, सोनल कुलकर्णी, अमोल साठे, मुक्ता जोशी, श्रद्धा घाणेकर, अनिल ताटके, प्रतिभा पवार, सुनिता टिल्लू, ऋचा बर्वे करणार आहेत.
‘समाजमाध्यमांचा कवितेवर होणारा परिणाम’ या विषयावर दुपारी १:३० वाजता परिसंवाद होणार असून अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजा दीक्षित असणार आहेत. यात आश्लेषा महाजन, अभिजित थिटे, प्रणव सखदेव, डॉ. वर्षा तोडमल यांचा सहभाग आहे. दुपारी ३ वाजता सुप्रसिद्ध कवयित्री अंजली कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध भाष्यकार रामदास फुटाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात ममता सिंधुताई सपकाळ, भरत दौंडकर, मृणालिनी कानिटकर, सुनीती लिमये, श्रीपाद जोशी, हनुमंत चांदगुडे, माधव हुंडेकर, अनिल दीक्षित, दिपाली ठाकूर, अर्चना संबरकर, मधुरा उमरीकर यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी ५:१५ वाजता समारोप समारंभ आयोजित करण्यात आला असून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार, सुप्रसिद्ध लेखिका ॲड. प्रार्थना सदावर्ते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. समारोप समारंभानंतर कवी बा. भ. बोरकर व कवी ना. धों. महानोर यांच्या कवितांचा ‘निसर्गगोत्री’ हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात चैत्राली अभ्यंकर, केतन अत्रे, संजय गोखले यांचा सहभाग असून नरेंद्र चिपळूणकर, सुभाष देशपांडे, अनिल कुंटे, राजेंद्र साळुंखे साथसंगत करणार आहेत. संहिता लेखन डॉ. सुजाता शेणई यांचे आहे.
0
0
1
8
1
2



