तुळजापूर दि २१ प्रतिनिधी डॉ सतीश महामुनी
उस्मानाबाद–लातूर–बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकी निमित्ताने धाराशिव जिल्ह्यामधून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची चिरंजीव सुनील चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. यापूर्वीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनेक निवडणुकांमध्ये सुनील चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावल्यामुळे भारतीय जनता पार्टी कडून त्यांना उमेदवारी मिळेल असे संकेत चर्चेत आहेत.

लातूर–बीड–धाराशिव या तिन्ही जिल्ह्यांमध्ये भाजपचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींची संख्या मोठी आहे. त्यामुळे भाजप या निवडणुकीकडे प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहत असून उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे.
मागील विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना निवडून आणण्यात सुनील मधुकरराव चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ऐन लोकसभा निवडणुकीत सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पूर्ण ताकदीने प्रचारात सहभाग घेतला होता.
2024 च्या विधान सभा निवडणूक मध्ये आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या निवडणुकीतही त्यांनी सक्रिय भूमिका निभावली होती. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे जिल्हाभर असलेले कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आणि सहकार क्षेत्रातील प्रभाव सुनिल चव्हाण व भाजपसाठी फायद्याचा ठरू शकतो, अशीही चर्चा सुरू आहे. काँग्रेसची पार्श्वभूमी असलेल्या चव्हाण कुटुंबाचा प्रभाव सुनिल चव्हाण यांच्यामुळे भाजपकडे वळल्यास ग्रामीण भागात पक्षाला अधिक बळ मिळू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
सुनील चव्हाण हे अणदूर येथील रहिवासी असून सहकार क्षेत्रात त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना, नळदुर्ग, श्री कुलस्वामिनी सह. सूतगिरणी तुळजापूर येथे त्यांनी संचालक आणि अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या संचालक पदी बिनविरोध निवड झालेली आहे. त्यामुळे सहकार आणि स्थानिक राजकारणातील त्यांचा संपर्क मजबूत मानला जातो.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातून माजी मंत्री बसवराज पाटील,सुनील चव्हाण यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. केंद्रात, राज्यात तसेच जिल्हा परिषद आणि अनेक नगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता असल्याने भाजपा कोणत्या चेहऱ्यावर विश्वास दाखवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, या मतदारसंघातून धाराशिव जिल्ह्यातील उमेदवाराला संधी दिल्यास जिल्ह्यात भाजपाला आणखी राजकीय बळ मिळेल, असा सूर भाजप कार्यकर्त्यांतून उमटत आहे. त्यामुळे उमेदवारीचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी कोणाच्या बाजूने देतात, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.