
0
0
3
7
4
5
गोव्यामध्ये संपन्न झालेले पश्चिम क्षेत्र प्रशिक्षण शिबिर ठरले संस्मरणीय….
तुळजापूर दि २७ प्रतिनिधी
कलेच्या साधनेमधून आणि कलावंताच्या जडणघडणी मधून उत्तम कलाकृती निर्माण होते त्याप्रमाणे उत्तम समाज व्यवस्था देखील निर्माण होण्याला प्रारंभ होतो. कलेच्या साधनेमधून होणारे समाज परिवर्तन यासाठीच संस्कार भारतीच्या ध्येय वाक्याला “सा कला या विमुक्तये” म्हटलेले आहे. गोव्याच्या सर्व दूर पसरलेल्या समुद्राच्या लाटा आणि निसर्ग सौंदर्य गोव्यातील प्राचीन मंदिराची परंपरा, गोव्याची खाद्य संस्कृती आणि जगभरातील पर्यटकांची मांदियाळी. तीव्र उन्हाच्या कडाक्यामध्ये हापूस आंब्याची चव त्याचबरोबर प्रत्येक खाद्यपदार्थांमध्ये काजूचा असलेला सहभाग यामुळे फोंडा येथे पवित्र नागेशी देवस्थान परिसरात संपन्न झालेले संस्कार भारतीच्या पश्चिम क्षेत्राचे प्रशिक्षण शिबिर तेवढेच मोलाचे महत्त्वाचे आणि सर्व कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरले.
गोव्याचे अध्यक्ष डॉ. भूषण भावे यांची संस्कार भारतीच्या कामांमधील कार्यमग्नता निष्ठा आणि पडेल त्या कामाला हात लावण्याची वृत्ती, गोव्याची संस्कृती गोव्याच्या मंदिरांचा आणि हिंदू संस्कृतीचा त्यांचा असलेला गाढा अभ्यास आणि प्रस्तुत करण्याची भाषण शैली यामुळे हे शिबिर पदोपदी नवनवीन संकल्पना समोर आणत गेले. या पश्चिम क्षेत्राच्या प्रशिक्षण वर्गाची देवगिरी प्रांताची विशेष उपलब्दी उद्घाटनासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची उपस्थिती व या शिबिरामध्ये आजपर्यंतच्या देवगिरी प्रांताच्या संघटनात्मक वाटचालीमध्ये देशपातळीवर चर्चा प्रवर्तक म्हणून देवगिरी प्रांताचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य स्नेहलताई पाठक यांची झालेली निवड आणि उपस्थित त्यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन अशा विविध अंगानी गोव्याच्या या अखिल भारतीय पश्चिम क्षेत्र प्रशिक्षण वर्गाला विशेष महत्त्व आहे.
संस्कार भारतीच्या अखिल भारतीय प्रशिक्षण शिबिर, अखिल भारतीय कलासाधक संगम, अखिल भारतीय लोककला महोत्सव, पश्चिम क्षेत्र प्रशिक्षण शिबिर अशा वेगवेगळ्या कार्यकर्त्यांची जडणघडण करणाऱ्या उपक्रमांना १९९८ पासून अनुभवण्याची संधी मिळाली. कलावंत जोडण्याची जगभरातील सर्वात मोठी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्ववादी विचाराने प्रेरित होऊन भारतीय नवजीवन हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्कार भारतीच्या अखिल भारतीय पातळीवर संघटन मंत्री असणारे अभिजीतदादा गोखले, अखिल भारतीय महामंत्री आश्विन दळवी, अखिल भारतीय मंत्री अशितोष आडोनी, पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे, ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर, गोव्याच्या अध्यक्ष डॉक्टर भूषण भावे, अखिल भारतीय मंत्री रवींद्र बेडेकर, अखिल भारतीय म्हणजे कला संयोजक देवेंद्र रावत, अखिल भारतीय कला दररोहर संयोजक ओजस हिराणी, अखिल भारतीय भूआलंकरण विधाप्रमुख रघुराज देशपांडे, देवगिरी प्रांत अध्यक्ष प्रा . स्नेहलताई पाठक, महामंत्री जगदीश देशमुख यांच्यासह अन्य निमंत्रित या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झालेले होते.
या तीन दिवसाच्या शिबिराचा समारोप अखिल भारतीय महामंत्री अश्विन दळवी यांनी करीत असताना दत्तोपंत ठेंगडी यांचे अशा प्रकारच्या प्रशिक्षण वर्गाला पवित्र यज्ञाप्रमाणे महत्त्व आहे यज्ञाची पूर्णाहुती देखील या शिबिराच्या पावित्र्या प्रमाणेच आहे असे सांगून पुन्हा पुन्हा प्रशिक्षण करणे किती आवश्यक आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. संस्कार भारतीने भारतीय नवजीवनम हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण सर्व कार्यकर्ता बंधू-भगिनी यांनी आपल्या प्रांत स्तरावर लक्षपूर्वक आणि उद्दिष्ट पूर्तीसाठी संघटनेने सांगितलेल्या परिमाणाप्रमाणे कार्यरत राहिले पाहिजे संघटनेला प्राधान्य देऊन वेळेचे नियोजन केले पाहिजे असे सांगितले.
कोणत्याही संघटनेसाठी कार्यकर्ता हा त्या संघटनेचा आत्मा आहे, संस्कार भारती मध्ये कलावंत असणारा कार्यकर्ता हाच मूळ आधार आहे असं सांगून अखिल भारतीय महामंत्री अश्विन दळवी यांनी कार्यकर्त्यांना रिफ्रेश करण्याची यंत्रणा अशा प्रकारच्या प्रशिक्षण वर्गामध्ये असते. आपण इच्छेने घेतलेली जबाबदारी शिस्तीत आणि संकल्पना समजून घेऊन पूर्ण करावी. आपल्या कार्यकर्त्यामध्ये स्नेहभाव हा स्थायीभाव असला पाहिजे, सर्वांचे ऐकून घेण्याची क्षमता आणि त्याला योग्य उत्तर देण्याचे दायित्व आपणच पार पाडले पाहिजे. समाज आणि संघटनेचा सेतू संस्कार भारतीचा कलावंत कार्यकर्ता आहे हे देखील आपण विसरू नये योग्य योजना करून काम करावे संकटाच्या काळात विशेष काळजी घेऊन काम करावे कार्यकर्त्याची लिस्ट त्याची शिस्तबद्धता आणि त्याचा कलेच्या प्रांतातील अभ्यास याच्या जोरावर कार्यकर्त्यांनी आपली योग्य क्षमता निर्माण करावी समाजामध्ये सर्व स्तरात आपले सौहार्दपूर्ण प्रस्थापित करावेत, संघटनेसाठी मान अपमान सहन करून संयम ठेवता आला पाहिजे, वेगवेगळी मतमतांतरे असू शकतात परंतु मनभेद असता कामा नये असे सांगून आपल्यामध्ये पूर्वीपासूनच समोर पण भाव आहे तो कायमस्वरूपी राहिला पाहिजे संस्कार भारतीच्या कामाला प्राथमिकता देता आली पाहिजे संघटने समोरील आव्हाने पेलण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी योग्य प्रयत्न देखील सर्वानुमते घेता आले पाहिजेत.
आजच्या बदलत्या कालानुरूप सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण झालेले वैचारिक आव्हान देखील संस्कार भारतीच्या कार्यकर्त्याला पेलता आली पाहिजेत त्या अनुषंगाने आपली वैचारिक मांडणी प्रभावी आणि सत्यावर आधारित राहिली पाहिजे. विरोधकांना विरोध करण्यासाठी आपली क्षमता वृद्धिंगत केली पाहिजे. कोणत्याही कामांमध्ये श्रेय घेण्याचा आपला स्वभाव नाही संस्कार भारतीने दिलेला हा संस्कार सर्व कार्यकर्त्यांना जपता आला पाहिजे. श्रेय न घेता संघरचनेप्रमाणे योग्य काम करण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन समारोपाच्या सत्रामध्ये अखिल भारतीय महामंत्री अश्विन दळवी यांनी केले. यासत्रात अखिल भारतीय संघटन मंत्री अभिजीत गोखले यांनी पश्चिम क्षेत्रातील प्रमुख उपस्थित पदाधिकारी यांनी या प्रशिक्षण शिबिराच्या दरम्यान निर्माण झालेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने समयोजित मार्गदर्शन केले. गोवा प्रांताचे अध्यक्ष भूषण भावे यांनी या तीन दिवसाच्या शिबिरामध्ये गोवा प्रशिक्षण शिबीर संपन्न करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा परिचय समारोपाच्या सत्रात करून दिला सर्वांनी टाळ्याच्या कडकडाटामध्ये कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. गोव्याच्या फळांचा आस्वाद तीन दिवसाच्या या शिबिरामध्ये प्रशिक्षण मध्ये सहभागी झालेल्या पदाधिकारी यांनी घेतला. पवित्र नागेशी देवस्थान समितीने या शिबिरासाठी केलेले योगदान देखील संस्मरणीय आहे. गोव्याचा निसर्ग सौंदर्य आणि संस्कार भारतीची कार्यपद्धती याचा जणू काही अद्वितीय मिलाफ या प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने झाल्याचा अनुभव सर्वांनाच आला. ते गोड फणस आणि तेवढेच महत्त्वाचे प्रशिक्षणाचे विषय यामुळे हे प्रशिक्षण शिबिर देखील तेवढेच लज्जतदार आणि उपस्थित कार्यकर्त्यांना महत्त्वाचे मोलाचे आणि प्रेरणादायी ठरले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संस्कार भारती या अखिल भारतीय पातळीवर काम करणाऱ्या संघटना कोणते उद्दिष्ट घेऊन कार्यरत आहेत. संघटनेची कार्यपद्धती संघटनेचे उद्दिष्ट आणि त्यासाठी काम करण्याची पद्धती, कार्यकर्त्याची निवड त्याचबरोबर दायित्व निर्वाहन करण्याची क्षमता या अशा अनेक विषयावर हे प्रशिक्षण प्रभावी ठरले. अखिल भारतीय पातळीवर ज्यांनी पहिल्यांदाच प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदविला त्यांच्यासाठी ही खूप मोठी कार्यशाळा ठरली. अनेकांना उजळणी करण्यासारखे हे प्रशिक्षण झाले.
( आपला विश्वासू -: डॉ सतीश महामुनी, सह महामंत्री संस्कार भारती देवगिरी प्रांत 9890024910 )
0
0
3
7
4
5



