ई-पेपरनोकरीब्रेकिंग

गाजत असलेले तुकाराम मुंडे यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ करण्याचा मान तुळजापूर तालुक्यातील चित्रकार खाजाभाई सय्यद यांना प्राप्त

देशभरातील प्रतिभा संपन्न कलावंत आणि उच्चपदस्थ यांचे केले खाजाभाई सय्यद यांनी रेखाटन

0 0 4 3 5 1

आयएएस तुकाराम मुंडे यांच्या जीवनावरील ‘तुकाराम’ कादंबरीचे मुखपृष्ठ साकारण्याचा मान प्रसिद्ध चित्रकार ख्वाजाभाई सय्यद यांना

धाराशिव दिनांक  १६ श्री.अनिल आगलावे

तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक गावचे सुपुत्र तथा सुप्रसिद्ध आर्ट डिझायनर ख्वाजाभाई मौलासाहेब सय्यद यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैलीच्या बळावर राज्याच्या साहित्यविश्वात पुन्हा एकदा वेगळी छाप उमटवली आहे

महाराष्ट्रातील प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख प्रशासक म्हणून ओळख असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित ‘तुकाराम’ या बहुचर्चित कादंबरीचे मुखपृष्ठ साकारण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांच्या या यशामुळे आरळी बुद्रुकसह तुळजापूर तालुका आणि धाराशिव जिल्ह्याच्या कला-वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ग्रामीण मातीतून उभारी घेत राष्ट्रीय स्तरावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ख्वाजाभाई सय्यद यांनी गेल्या अनेक वर्षांत साहित्य, चित्रपट, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच कॉर्पोरेट क्षेत्रासाठी शेकडो दर्जेदार कलाकृती, लोगो, पुस्तकांची मुखपृष्ठे आणि संकल्पनात्मक डिझाईन्स साकारल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत आशय, आधुनिकता आणि प्रभावी दृश्य मांडणीचा उत्कृष्ट संगम दिसून येतो.

ख्वाजाभाई सय्यद यांच्या कारकिर्दीतील आणखी एक उल्लेखनीय टप्पा म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांसाठी त्यांनी केलेले योगदान. पुणे येथील संजय नहार यांच्या ‘सरहद’ संस्थेतर्फे पंजाबमधील घुमान तसेच दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या संपूर्ण डिझाईनची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली होती. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत विविध राज्यस्तरीय मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरवही करण्यात आला. महाराष्ट्र सरकार तर्फे आयोजीत रायगड महोत्सवाचे देखील पूर्ण डिझाईन आणि पेंटिंग काम सय्यद यांनी केले होते.

आता त्यांनी साकारलेले ‘तुकाराम’ कादंबरीचे मुखपृष्ठ साहित्यविश्वात विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. मुखपृष्ठामध्ये आयएएस तुकाराम मुंडे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा, निस्वार्थ प्रामाणिकपणाचा, धाडसी निर्णयक्षमतेचा आणि प्रशासनातील कर्तव्यनिष्ठेचा प्रभावी आविष्कार करण्यात आला आहे. आधुनिक ग्राफिक शैली, आकर्षक रंगसंगती, आशयघन मांडणी आणि व्यक्तिमत्त्वाला न्याय देणारी संकल्पना यामुळे हे मुखपृष्ठ वाचकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. पुस्तकाच्या आशयाशी पूर्णपणे सुसंगत अशी दृश्यभाषा या मुखपृष्ठातून प्रभावीपणे व्यक्त होत असल्याची प्रतिक्रिया साहित्यप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

या कादंबरीचे लेखक शफी पठाण असून, प्रसिद्ध साहित्यिक शरद तांदळे यांच्या न्यू इरा पब्लिकेशन, पुणे तर्फे या पुस्तकाचे प्रकाशन १७ जुलै रोजी आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या या कादंबरीबाबत वाचकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करूनही ख्वाजाभाई सय्यद यांनी आपल्या मातृभूमीशी असलेली नाळ कायम जपली आहे. आपल्या गावाचा आणि जिल्ह्याचा अभिमान जपत त्यांनी सातत्याने उत्कृष्ट कलाकृती साकारल्या असून, त्यांच्या प्रत्येक यशामुळे ग्रामीण भागातील प्रतिभेलाही राष्ट्रीय व्यासपीठ मिळू शकते, हा विश्वास अधिक दृढ होत आहे.

आरळी बुद्रुकसारख्या ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावरील साहित्यकृतीचे मुखपृष्ठ साकारण्याचा बहुमान मिळवणारे ख्वाजाभाई सय्यद हे आज धाराशिव जिल्ह्याच्या कला-सामर्थ्याचे प्रेरणादायी प्रतीक ठरले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल साहित्य, कला, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांसाठी त्यांचा प्रवास प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरत आहे.

विविध क्षेत्रांत कलाकृती साकारण्याची संधी…

“आजपर्यंत मला संगीत, कला, क्रीडा आणि साहित्य अशा विविध क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळाली आहे. भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांसाठी कलाकृती साकारल्या. तसेच टी-सीरिज, सारेगामा यांसारख्या नामांकित संस्थांसाठीही डिझाईन करण्याची संधी लाभली. प्रत्येक कलाकृतीत विषयाचा आशय, व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आणि कलात्मक दर्जा जपण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. आयएएस तुकाराम मुंडे यांच्या जीवनावरील ‘तुकाराम’ कादंबरीचे मुखपृष्ठ साकारण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.”

— ख्वाजाभाई सय्यद, मुंबई, प्रसिद्ध ग्राफिक्स डिझायनर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 3 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे